MahaAgri-AI: महाराष्ट्र कृषी विभागाकडून कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्पांसाठी प्रस्ताव आवाहन
मुंबई, ९ सप्टेंबर २०२६: महाराष्ट्र कृषी विभागाने शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व जनरेटिव्ह एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी ‘MahaAgri-AI’ धोरणांतर्गत नवीन प्रस्ताव आवाहन (Call for Proposal) जाहीर केले आहे. सन २०२५ ते २०२९ या कालावधीसाठी राबवण्यात येणार्या या धोरणासाठी सुमारे ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
धोरणाची उद्दिष्टे
उत्पादकता घट, पाणी टंचाई, बाजारातील अकार्यक्षमता आणि हवामान बदलाचे परिणाम या शेतीसमोरील प्रमुख आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणे हे या धोरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे. यामध्ये अॅग्रिकल्चरल डेटा एक्सचेंज (ADeX), एआय सँडबॉक्स, रिमोट सेन्सिंग व जिओस्पेशियल इंटेलिजन्स इंजिन आणि बहुभाषिक शेतकरी सल्ला प्रणाली VISTAAR यांसारख्या डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत.
स्टार्टअप्स व नवोन्मेषकांसाठी संधी
स्टार्टअप्स, तंत्रज्ञान कंपन्या आणि संशोधन संस्थांना सँडबॉक्स सुविधा, डेटा एकत्रीकरण सहाय्य आणि सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. द्राक्षे, केळी व डाळिंब या पिकांसाठी ब्लॉकचेन आधारित ट्रेसेबिलिटी प्लॅटफॉर्म विकसित करण्यावरही भर देण्यात येणार आहे.
अंमलबजावणी टप्पे
हे धोरण चार टप्प्यांत राबवले जाणार आहे- पहिल्या टप्प्यात संस्थात्मक उभारणी, दुसर्या टप्प्यात निवडक जिल्ह्यांमध्ये पथदर्शी चाचणी, तिसर्या टप्प्यात राज्यव्यापी अंमलबजावणी आणि चौथ्या टप्प्यात धोरण सुधारणा व विस्तार केला जाणार आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय सुकाणू समिती आणि राज्यस्तरीय तांत्रिक समिती याची अंमलबजावणी करणार आहे.


