RBI कडून मोठी घोषणा; आता Bharat Connect वर युरो, पाऊंड, दिरहमसह ५ चलनांत परकीय चलन सेवा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) परकीय चलन (फॉरेक्स) सेवांबाबत मोठे पाऊल उचलले आहे. RBI चे डेप्युटी गव्हर्नर रोहित जैन यांनी ९ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबईत झालेल्या ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६ मध्ये Bharat Connect प्लॅटफॉर्मवर बहु-चलन सुविधेचा शुभारंभ केला. आतापर्यंत ही सुविधा फक्त अमेरिकी डॉलरपुरती मर्यादित होती.
आता युरो (EUR), ब्रिटिश पाऊंड (GBP), कॅनेडियन डॉलर (CAD), स्विस फ्रँक (CHF) आणि UAE दिरहम (AED) या पाच चलनांचा समावेश करण्यात आला आहे. सध्या ही सेवा नियंत्रित वापरकर्ता गटासाठी (Controlled User Group) प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे.
यामुळे सर्वसामान्य नागरिकांना परदेश प्रवास, शिक्षण, व्यवसाय व आंतरराष्ट्रीय पेमेंटसाठी परकीय चलन खरेदी, परदेशी पैसे पाठवणे, फॉरेक्स कार्ड रिलोड करणे आणि FX-Retail मार्फत थेट दर पाहणे शक्य होणार आहे. MobiKwik, BHIM, bob World, पंजाब नॅशनल बँक, फेडरल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अॅक्सिस बँकेसह अनेक बँका व चॅनेल्सद्वारे ही सेवा उपलब्ध असेल.


